Tuesday, August 13, 2024

कर्जत तालुक्यात सुरळीत वीज पुरवठ्यासाठी उर्जामंत्र्यांसोबत बैठक घेणार : सुधाकर घारे

-




- कर्जत तालुका विज ग्राहक संघर्ष समितीच्या साखळी उपोषणाची दखल

कर्जत, दि. १३ ऑगस्ट २०२४, वार्ताहर: कर्जत तालुक्यातील वीज पुरवठा सुरळीत करण्याच्या मागणीसाठी महावितरणच्या विरोधात कर्जत तालुका वीज ग्राहक संघर्ष समितीने कर्जत येथील टिळक चौकात साखळी उपोषण सुरु केले आहे. रायगड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुधाकर भाऊ घारे यांनी मंगळवारी (दि.१३) रोजी वीज ग्राहक संघर्ष समितीच्या साखळी उपोषणाची घेऊन ऊर्जा मंत्री यांच्या समवेत बैठक लावण्यासाठी रायगडचे खासदार सुनील तटकरे यांना फोन करुन तीन ते चार दिवसांत उर्जामंत्र्यांसोबत बैठक लावण्याबाबत आंदोलकांना शब्द दिला.

महावितरणच्या अनागोंदी कारभार विरोधात कर्जत मधील सर्व सामान्य नागरिक आक्रमक झाला आहे. महावितरणच्या निष्काळजी कारभाराविरोधात कर्जत तालुका वीज ग्राहक संघर्ष समितीने साखळी उपोषण सुरू केले आहे.

गेल्या काही महिन्यांपासून कर्जत शहरात आणि ग्रामीण भागात वारंवार वीजपुरवठा खंडित होत आहे. भरमसाठ वीज बिल येत आहे. महावितरणकडे अनेक वेळा तक्रारी करूनही समस्येचे निराकरण झाले नाही. त्यामुळे कर्जत तालुका विज ग्राहक संघर्ष समिती आक्रमक झाली असून समितीने साखळी उपोषण सुरु केले आहे.
मंगळवारी सुधाकर घारे यांनी या उपोषणकर्त्यांची भेट घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. तसेच महावितरणच्या निष्काळजी कारभाराविरोधात संताप व्यक्त करत समस्या मार्गी लावण्याबाबत आपण पुढाकार घेऊन हा प्रश्न मार्गी लावू असा शब्द दिला.

यावेळी सुधाकर घारे यांनी वीज ग्राहक संघर्ष समितीच्या साखळी उपोषणाची दखल घेऊन ऊर्जा मंत्री यांच्या समवेत बैठक लावण्यासाठी विनंती केल्याबद्दल संघर्ष समितीचे प्रमुख ऍड. कैलास मोरे साहेब यांनी घारे यांचे आभार मानले.

चौकट

घारे यांचा खासदार तटकरे यांना फोन

सुधाकर घारे यांनी उपोषणस्थळी भेट दिल्यानंतर उपोषणकर्त्यांनी महावितरणच्या तक्रारींचा पाढाच घारे यांच्यासमोर वाचला. यावेळी घारे यांनी तातडीने रायगडचे खासदार सुनील तटकरे यांना फोन करुन या विषयाची सविस्तर माहिती देत उर्जा मंत्र्यांसोबत बैठक लावण्याची विनंती केली. खासदार तटकरे यांनी देखील उपोषणाची दखल घेत येत्या चार दिवसांत उर्जामंत्र्यांसोबत बैठक घेऊन वीजेचा प्रश्न मार्गी लावण्याबाबत शब्द दिला.

No comments:

Post a Comment