मुंबई, 05 ऑगस्ट, 2026 | महासागर न्यूज एजन्सी: टेमासेक आणि मोतीलाल ओसवाल समूह यांच्या पाठबळ असलेल्या मोलबायो डायग्नॉस्टिक्सने आपल्या ₹९३०.७ कोटींच्या प्रारंभिक समभाग विक्रीचा (IPO) किंमतपट्टा प्रति समभाग ₹७६८ ते ₹८०७ निश्चित केला आहे. हा सार्वजनिक इश्यू १० ऑगस्ट रोजी गुंतवणुकीसाठी खुला होणार असून १२ ऑगस्ट रोजी बंद होईल. तर अँकर गुंतवणूकदारांसाठीचा इश्यू ७ ऑगस्ट रोजी खुला करण्यात येणार आहे.
गुंतवणूकदारांना किमान १८ इक्विटी समभागांसाठी अर्ज करता येणार असून त्यानंतर त्याच्या पटीत बोली लावता येईल. किंमतपट्ट्याच्या उच्च स्तरावर या आयपीओचे मूल्य ₹९३०.७ कोटी इतके आहे. या इश्यूमध्ये ₹२०० कोटींच्या नव्या समभागांचा समावेश असून, विद्यमान भागधारकांकडून ९१.६६ लाख समभागांची ऑफर फॉर सेल (OFS) करण्यात येणार आहे.
हा आयपीओ ₹३,०६७ कोटींच्या धूत ट्रान्समिशनच्या सार्वजनिक इश्यूबरोबरच १० ऑगस्ट रोजी खुला होणार असून त्या दिवशी मुख्य बाजारातील दोन प्रमुख आयपीओंपैकी एक असेल. ऑफर फॉर सेलमध्ये प्रवर्तक एक्सोरा ट्रेडिंग, डॉ. चंद्रशेखर भास्करण नायर, गुंतवणूकदार इंडिया बिझनेस एक्सलन्स फंड आणि अन्य सात भागधारक समभाग विक्री करणार आहेत.
या इश्यूनंतर प्रवर्तकांचा हिस्सा सध्याच्या ४६.६५ टक्क्यांवरून कमी होणार असून उर्वरित ५३.३५ टक्के हिस्सा टेमासेक होल्डिंग्स समर्थित व्ही सायन्सेस इन्व्हेस्टमेंट्स आणि मोतीलाल ओसवाल समूहाच्या इंडिया बिझनेस एक्सलन्स फंडसह इतर गुंतवणूकदारांकडे राहील.
गोवा-स्थित मोलबायो डायग्नॉस्टिक्स ही पॉइंट-ऑफ-केअर (POC) निदान उपाय विकसित करणारी कंपनी आहे. कंपनीचे प्रमुख ट्रूनॅट प्लॅटफॉर्म १०० हून अधिक देशांमध्ये पेटंट संरक्षित असून त्याद्वारे क्षयरोग (टीबी), कोविड-१९, हिपॅटायटिस बी आणि सी, ह्युमन इम्युनोडेफिशियन्सी व्हायरस (एचआयव्ही) आणि ह्युमन पॅपिलोमाव्हायरस (एचपीव्ही) यांसारख्या आजारांची जलद आण्विक चाचणी करता येते.
पीसीआर-आधारित हे प्लॅटफॉर्म विशेषतः मर्यादित संसाधने असलेल्या भागांमध्ये एका तासाच्या आत निदान अहवाल उपलब्ध करून देण्यासाठी विकसित करण्यात आले आहे.
कंपनी नव्या समभाग विक्रीतून मिळणाऱ्या निधीपैकी ₹१०५.५ कोटींचा वापर तिची पूर्ण मालकीची उपकंपनी बिगटेकमार्फत संशोधन व विकास (R&D) केंद्र तसेच सेंटर ऑफ एक्सलन्स आणि कार्यालयीन पायाभूत सुविधा उभारण्यासाठी करणार आहे. आणखी ₹७२.२ कोटी गोवा आणि विशाखापट्टणम येथील उत्पादन प्रकल्पांसाठी यंत्रसामग्री आणि उपकरणे खरेदी करण्यासाठी वापरले जाणार असून उर्वरित निधी सर्वसाधारण कॉर्पोरेट उद्दिष्टांसाठी वापरला जाईल.
आयपीओच्या सादरीकरणावेळी श्रीराम नटराजन (कार्यकारी संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी), डॉ. चंद्रशेखर भास्करण नायर (कार्यकारी संचालक व मुख्य तंत्रज्ञान अधिकारी), मनन बिमल खोखाणी (अध्यक्ष – वित्त व लेखा आणि मुख्य वित्तीय अधिकारी), शिवा श्रीराम (अध्यक्ष – व्यवसाय विकास) आणि इंद्रनील बोरकाकोटी (अध्यक्ष – कॉर्पोरेट धोरण, विलीनीकरण व अधिग्रहण आणि गुंतवणूकदार संबंध) उपस्थित होते.
आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये मोलबायो डायग्नॉस्टिक्सने दमदार आर्थिक कामगिरी नोंदवली असून निव्वळ नफा १४.८ टक्क्यांनी वाढून ₹१६६.६ कोटींवर पोहोचला, तर महसूल ४१.७ टक्क्यांनी वाढून ₹१,४४५.७ कोटी झाला.
या इश्याचे बुक-रनिंग लीड मॅनेजर्स म्हणून कोटक महिंद्रा कॅपिटल कंपनी, आयआयएफएल कॅपिटल सर्व्हिसेस आणि जेफरीज इंडिया काम पाहत आहेत.
समभाग वाटपाचा आधार १३ ऑगस्ट रोजी निश्चित होण्याची अपेक्षा असून कंपनीचे समभाग १७ ऑगस्ट रोजी शेअर बाजारात सूचीबद्ध होण्याची शक्यता आहे.








