Thursday, May 30, 2024

आमदार महेंद्र थोरवेंकडून जीवाला धोका - भाजप कार्यकर्ते ॲडव्होकेट ऋषिकेष जोशी यांचा गंभीर आरोप; कर्जतमध्ये गुन्हे वाढले

ॲड. ऋषिकेष जोशी

कर्जत, 30 मे २०२४, प्रतिनिधी (MND): कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांच्याकडून माझ्या जीवाला धोका असून याबाबत मी पोलिसांकडे तक्रार केली आहे. मात्र, रायगड जिल्हा पोलिस प्रशासन थोरवे यांच्या दहशतीखाली काम करत असल्याचा गंभीर आरोप भाजपचे कार्यकर्ते ॲड. ऋषिकेश जोशी यांनी केला आहे.  

ॲडव्होकेट ऋषिकेश जोशी यांनी कर्जतमध्ये पत्रकार परिषद घेऊन आमदार थोरवे यांच्या दहशतीबद्दल आणि त्यांच्या वरदहस्ताखाली सुरु असलेल्या अनधिकृत कामांबद्दल आरोप केले. जोशी म्हणाले, कर्जत शहरात भाई हुतात्मा कोतवाल व्यायाम शाळेच्या समोर असलेल्या खुल्या मैदानात व्यायामशाळा बांधण्याच्या नावावर व्यावसायिक दुकान गाळे बांधले आहेत. याची चौकशी करावी याबाबत कर्जत पोलिसांत तक्रार केली. तसेच माझ्या जीवाला त्यांच्याकडून धोका संभवतो, असा आरोप जोशी यांनी केली आहे.

ॲड. जोशी म्हणाले, याबाबत मी चार महिन्यांपूर्वी पत्र दिले आहे. एकमहिन्यापूर्वी तक्रार देखील दिली. मात्र माझा जबाब घेतला जात नाही. त्यामुळे माझ्या जीवाचे काही बरे वाईट झाले तर त्याला आमदार थोरवे जबाबदार असतील, अशी तक्रार केली आहे. मात्र रायगड जिल्हा पोलिस प्रशासन आमदारांच्या दहशतीखाली काम करत आहे, असा आरोप अँड. जोशी यांनी पत्रकारपरिषदेत केला. 

यावेळी ॲड. जोशी म्हणाले, कर्जतमध्ये काही दिवसांपूर्वी एका महिलेवर हल्ला झाला. तो गुन्हा एलसीबीकडे न देता त्याचा तपास कर्जत पोलिसांनीच केला. तसेच पळसदरी तलावात एक प्रेत सापडले आहे. याची कोणाला कल्पना नाही. तसेच पूर्वी भाजपच्या कार्यकर्ते असलेल्या आणि सध्या शिंदे गटात काम करणाऱ्या आरती माळवे यांचा पळसदरी रस्त्यावर अपघात होऊन मृत्यू झाला. याबाबत संशय व्यक्त करत स्थानिक आमदारांनी याबाबत आवाज का उठवला नाही असा सवाल केला, याबाबत सीबीआयतर्फे चौकशी करावी व या घटनेची मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी गांभीर्याने दखल घ्यावी, अशी मागणी केली. 

कर्जत विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या पोलीस ठाण्यांमध्ये गुन्ह्यांची संख्या वाढत आहे. कर्जत, खोपोली, नेरळ, माथेरान पोलीस स्टेशनमध्ये त्रस्त झालेल्या अधिकाऱ्यांच्या स्टेशन डायऱ्या तपासा त्यांनी डायऱ्यांमध्ये थेट राजकीय दबाव आल्याचे नमुद केले आहे. यापूर्वी असे कधी झाले नव्हते पोलिसांवर राजकीय दबाव आहे, हे पोलिस नमुद करतात हे फार गंभीर आहे. यामध्ये कोणतीही कारवाई जिल्हा पोलिस प्रमुखांकडून होत नाही. असे देखील अँड. जोशी म्हणाले.

चौकट :

पांडूरंगाची मुर्ती स्मशानभूमीच्या जागेत ! 

नगर परिषद हद्दीत प्रति आळंदी व पंढरपूर उभारण्यात आले आहे. येथे श्रीराम पुलानजीक पांडुरंगाची ५१ फूट मूर्ती बसवण्यात आली आहे. त्या मूर्तीचे लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात होते. मात्र, ज्या जागेवर ही मूर्ती बसविली आहे. ती जमिन स्मशानभूमीची आहे, असा गौप्यस्फोट ॲड. ऋषिकेश जोशी यांनी पत्रकार परिषदेत केला. मुख्यमंत्र्यांची फसवणूक करुन या मुर्तीचे उद्घाटन केले. याप्रकरणी चौकशी करुन कारवाई करण्यात यावी असे जोशी म्हणाले. या प्रकरणी जिल्हाधिकारी, नगरविकास खाते, आणि जिल्हा पोलिस प्रमुखांकडे तक्रार दाखल केली असल्याची माहिती जोशी यांनी दिली.

No comments:

Post a Comment