Friday, September 22, 2023

डीबीएस उपकरण बदलाच्या शस्त्रक्रियेमुळे रुग्णाच्या प्रकृतीत लक्षणीय सुधारणा, मुंबई सेंट्रल येथील वोक्हार्ट रुग्णालयातील उपचारामुळे 59 वर्षांच्या पार्किन्सस आजाराशी झुंजणाऱ्या रुग्णाची प्रकृती सुधारली


मुंबई, 22 सप्टेंबर 2023 (Mahasagar News):
 श्री. विशाल मेनन (बदललेले नाव) यांच्यावर 2019 साली डीबीएस उपकरण बसवण्यासाठी शस्त्रक्रिया करण्यात आली होती त्यानंतर पुढील 3 वर्षे त्यांची प्रकृती उत्तम होती. मात्र गेल्या 1 वर्षापासून  त्यांच्यात पुन्हा पार्किन्ससची लक्षणे दिसू लागली होती. यामुळे मेनन यांनी मुंबईतील अनेक नामवंत न्यूरोलॉजिस्ट आणि न्युरोसर्जन यांची भेट घेऊन त्यांच्याशी सल्लामसलत केली होती.  मात्र त्यांचे म्हणावे तसे समाधान झाले नव्हते. अखेर श्री. मेनन यांना जून 2023 मध्ये मुंबई सेंट्रल येथील वोक्हार्ट रुग्णालयात दाखल करण्यात आले.

डॉ.मनीष बालदिया हे वोक्हार्ट रुग्णालयातील पार्किन्सस आजारासाठीच्या डीबीएस शस्रक्रियेचे तज्ज्ञ न्युरोसर्जन आहेत.  त्यांच्या देखरेखीखाली श्री. मेनन यांच्यावर चाचण्या करण्यात आल्या आणि या चाचण्यांनंतर श्री. मेनन यांचे डीबीएस उपकरण बदलण्याशिवाय पर्याय नसल्याचा निष्कर्ष डॉ.बालदिया यांनी काढला. श्री. मेनन यांचा पार्किन्सस आजार बळावत चालला होता आणि त्याला नियंत्रणात ठेवण्यासाठी अत्याधुनिक कार्यप्रणालीने युक्त असे डीबीएस उपकरण बसवण्याशिवाय पर्याय नव्हता. 

6 जुलै, 2023 रोजी श्री. मेनन यांच्यावरील शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली. या शस्त्रक्रियेदरम्यान डॉ. बालदिया यांनी नव्या डीबीए उपकरणाचे रोपण केले,  मेंदूतील हालचाली नियंत्रित करणार्‍या नियंत्रकांना उत्तेजित करून त्यांनी नीटपणे काम करावे यासाठी हे नवे उपकरण मदत करते. या शस्त्रक्रियेनंतर श्री. मेनन यांनी त्यांच्या प्रकृतीत तत्काळ बदल जाणवण्यास सुरुवात झाली. शस्त्रक्रियेनंतर दोन तासांत त्यांना विनाआधार चालता येऊ लागले, त्यांच्या हाताची पकडही मजबूत होऊ लागली. या शस्त्रक्रियेनंतर पोटऱ्यांमध्ये असलेला ताठरपणाही कमी झाला. इतकंच नाही तर पार्किन्ससमुळे श्री. मेनन यांच्या मंदावलेल्या हालचाली आता वेगाने होऊ लागल्या होत्या आणि त्यांच्या हालचालींमध्ये पूर्वीप्रमाणे सफाई आली होती.

या शस्त्रक्रियेबाबत बोलताना डॉ.मनीष बालदिया म्हणाले की, श्री. मेनन यांच्या उदाहरणावरून आपल्याला डीबीएस उपकरण बदलाच्या शस्त्रक्रियेचे महत्त्व प्रभावीपणे पटण्यास मदत होऊ शकते. शरीरावर नियंत्रण ठेवण्यासाठी मेंदूकडून सूचना दिल्या जातात, पार्किन्ससमुळे यात बाधा निर्माण होतात. डीबीएस उपकरण बदलाच्या शस्त्रक्रियेमुळे रुग्णाला पूर्वीप्रमाणे हालचाल करणं शक्य होतं आणि त्याच्या सर्वांगीण आयुष्यावर सकारात्मक परिणाम झालेला पाहायला मिळतो. पार्किन्ससमुळे त्रास झेलणाऱ्या रुग्णांना पुन्हा पूर्वीप्रमाणे आयुष्य जगता यावे यासाठी ही शस्त्रक्रिया किती महत्त्वाची आहे हे आपल्याला या केसवरून कळू शकते.   

पार्किन्ससच्या रुग्णांसाठी डीबीएस उपकरण बदल शस्त्रक्रिया ही अत्यंत प्रभावी आहे. कमीतकमी चिरफाड करता ही शस्त्रक्रिया करणे हे शक्य आहे. या शस्त्रक्रियेमुळे रुग्णाला बराच दिलासा मिळतो ज्यामुळे पार्किन्ससने ग्रस्त रुग्णांनी तज्ज्ञ डॉक्टरांशी यासंदर्भात सल्लामसलत करणे हे त्यांच्यासाठी फायदेशीर ठरेल. डीबीएस उपकरण बदलाच्या शस्त्रक्रियेमध्ये मेंदूत विशिष्ट ठिकाणी इलेक्ट्रोड बसवले जातात. यामुळे पार्किन्ससच्या रुग्णांना होत असलेला कंपाचा, ताठरपणाचा, हालचालींवर आलेल्या नियंत्रणाचा त्रास दूर होण्यास मदत होते. या शस्त्रक्रियेमुळे पार्किन्ससने ग्रासलेल्या रुग्णाचे आयुष्य सुधारण्यास मदत होते आणि त्याला स्वावलंबी जीवनाचा आनंदही लुटता येतो. 


No comments:

Post a Comment